Tuesday, December 29, 2009

द्रोणाचार्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार बंद करा-प्रदीप सोळुंके
सकाळ वृत्तसेवा
Sunday, November 29, 2009 AT 12:00 AM (IST)
pradip solunke,sambhaji brigade

औरंगाबाद - "केवळ राजांच्या आणि स्वतःच्या मुलांना शिक्षण देणाऱ्या द्रोणाचार्यांच्या नावाने शिक्षकांना दिला जाणारा पुरस्कार बंद करावा,' अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्‍ते प्रदीप सोळुंके यांनी शनिवारी (ता. 28) येथे केली.

डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेतर्फे संत एकनाथ रंगमंदिरात महात्मा फुले जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. परिषदेचे विभागीय अध्यक्ष व्यंकटराव जाधव अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप देशमुख, उपशिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर, श्री. बनसोड, मराठा सेवा संघाचे प्रवक्ते विंग कमांडर टी. आर. जाधव, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, भाऊसाहेब तुपे यांची उपस्थिती होती.

श्री. सोळुंके म्हणाले, की ""काही चुकीचे पायंडे पडले आहेत. द्रोणाचार्यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो. काय होते, द्रोणाचार्यांचे कर्तृत्व. त्यांनी फक्त 106 जणांना शिक्षण दिले. पाच पांडव, शंभर कौरव आणि स्वतःचा मुलगा अश्‍वत्थामा. एवढेच त्यांचे शिष्य होते. शोषित, पीडित समाजातील एकलव्याला शिक्षण देण्यास नकार दिला. अशा व्यक्तीच्या नावाने दिला जाणारा द्रोणाचार्य पुरस्कार बंद केला पाहिजे,'' अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. बहुजन समाजाला एकेकाळी शिक्षणाचा अधिकार नाकारला होता. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे तो मिळाला आहे. या युगात शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. त्यांना बस, रेल्वेमधून नव्हे तर विमानातून फिरण्याची स्वप्ने पाहण्याची सवय लागली पाहिजे. त्यांच्यात उच्च शिक्षणाचाच ध्यास असला पाहिजे. क्रिकेट, सिनेमातील नट्या हे मुला-मुलींच्या चर्चेचे विषय असता कामा नये.''

श्री. जाधव म्हणाले, की शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून त्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. समाज घडविण्याकरिता शिक्षकांनी पुढाकार घ्यावा.
श्री. गाडेकर, श्री. तुपे, श्री. देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विपिन विसपुते यांनी केले

No comments:

Post a Comment